Mahan%20Rahasya.jpg

महान रहस्य

श्रीमाताजी

साहाय्यक लेखक

नलिनीकांत (लेखक)

पवित्र (वैज्ञानिक)

आन्द्रे (कारखानदार)

प्रणव (मल्ल)

पान क्र. ०१


प्रकाशक :

श्रीअरविंद आश्रम (पुस्तक विभाग)

पाँडिचेरी

मुद्रक :

श्रीअरविंद आश्रम प्रेस, पाँडिचेरी

फेब्रुवारी १९५६

पान क्र. ०२


महान रहस्य

सहा आत्मनिवेदनें आणि उपसंहार


सहसा असें घडत नाहीं, पण एकदां सहा जगप्रसिद्ध व्यक्ती योगायोगानें एका प्राणरक्षक बोटीमध्यें एकत्र आल्या आहेत. मानवप्रगतीविषयी विचार करण्यासाठी भरणाऱ्या विश्वसंमेलनाकरितां त्या ज्या जहाजांत बसून चालल्या होत्या, तें दुर्दैवानें समुद्रामध्यें बुडूं लागल्यामुळें त्यांना या प्राणरक्षक बोटीचा आसरा घ्यावा लागला आहे.

त्या बोटीमध्यें एक सातवी व्यक्तीहि आहे. ती व्यक्ति वयानें तरुण किंवा अजर दिसत आहे. तिनें असा कांहीं पोषाख केला आहे कीं ती जणुं कोणत्याहि देशांतील किंवा कोणत्याच विशिष्ट काळांतील नसावी. सुकाणूजवळ शांत आणि स्तब्ध अशी ती बसून राहिली आहे; तरी पण दुसरे लोक काय बोलत आहेत इकडे मात्र त्या व्यक्तीचें चांगलें लक्ष आहे. इतर सर्व मात्र तिला क्षुल्लक अथवा दुर्लक्षणीय समजत आहेत.

पान क्र. ०३



त्या सर्व व्यक्ती म्हणजे

१. मुत्सद्दी

२. लेखक

३. वैज्ञानिक

४. कलावंत

५. कारखानदार

६. मल्ल

७. अज्ञात व्यक्ति


पाणी जवळ जवळ संपलेलें आहे, अन्न पुरवठा संपत आला आहे. शारीरिक वेदना असह्य होत आहेत. क्षितिजावर आशा देणारें कांहींच दिसत नाहीं. मृत्यू जवळ येऊं लागला आहे. त्यावेळचें दु:ख विसरण्याकरतां प्रत्येकजण आपली जीवनकथा सांगत आहे.

[ पडदा उघडतो ]

पान क्र. ०४



मुत्सद्दी


तुम्ही तशी इच्छा प्रदर्शित केलीत, म्हणून मीच प्रथम माझ्या जीवनाची कथा आपल्याला सांगतो.

राजकारण-धुरंधराचा मी मुलगा असल्यानें बालवयापासूनच, राज्यकारभार व राजकारणांतील गुंतागुंती या बाबतच्या प्रश्नांशीं माझा चांगला परिचय होता. माझे आईवडील आपल्या मित्रांना मेजवान्या देत त्यावेळीं निरनिराळ्‌या प्रश्नांसंबंधींच्या चर्चा मनमोकळेपणानें होत. त्यावेळीं मी बारा वर्षांचा होतो. या मेजवान्यांच्या वेळीं मीहि हजर असे. वेगवेगळ्‌या राजकीय पक्षांच्या मतांतील गौप्य मला माहीत असे आणि त्यामुळें प्रत्येक अडचणीवरील सोपा तोडगा माझ्या लहानशा पण तरतरीत मेंदूत तयार असे.

माझ्या अभ्यासालाहि साहजिकच तीच दिशा लागली, व राज्यशास्त्राचा एक बुद्धिमान् विद्यार्थी म्हणून माझी गणना होऊं लागली.

नंतरच्या जीवनांत हें तत्त्वज्ञान व्यवहारांत उतरविण्याचा

पान क्र. ०५



प्रसंग आला त्यावेळीं मात्र पहिल्याप्रथमच मोठ्याच अडचणी उभ्या राहिल्या व त्यांना तोंड द्यावें लागलें. आपल्या विचारांना प्रत्यक्ष व्यावहारिक स्वरूप देणें हें कसें जवळजवळ अशक्य होऊन बसतें, हें मला समजून आलें. माझ्या तत्त्वज्ञानाला मुरड घालून व्यवहाराशीं सारखें जुळतें घ्यावें लागलें व त्यामुळें तो माझा उच्च ध्येयवाद शुष्क होऊं लागला.

मला असेंहि आढळून आलें कीं वैयक्तिक मूल्याचें मोजमाप, 'किती यश मिळालें', यावरून करण्यांत अर्थ नाहीं. फारतर इतरांना खूष ठेवण्याची कला व परिस्थितीशीं जुळतें घेण्याचें सामर्थ्य किती आहे, याचें तें मोजमाप होईल. जनतेमध्यें ज्या उणिवा किंवा जे दोष आहेत, त्यांची सुधारणा करण्यापेक्षां त्या दोषांची स्तुतीच, यश मिळविण्याकरतां करावी लागते, असें मला आढळून आलें.

माझ्या जीवनांतील तेजस्वी पराक्रमांची माहिती आपणां सर्वांना आहे, अशी माझी खात्री आहे; म्हणून त्यासंबंधीं अधिक विस्तार करण्याचें कारण नाहीं. तथापि एवढें सांगावेसें वाटतें कीं मी ज्यावेळीं मुख्य प्रधान झालो व त्या अधिकारामुळें खरी सत्ता माझ्या हातीं आली, त्यावेळीं मानवांचें हित साधण्याच्या, महत्त्वाकांक्षांची मला आठवण झाली व त्यांचाच मागोवा घेऊन कारभार चालविण्याचा मीं प्रयत्न केला. कोणत्याहि विशिष्ट पक्षाचा न होण्याचा मीं प्रयत्न केला. जगाची फाटाफूट ज्या राजकीय व सामाजिक विचारधारांच्या संघर्षामुळें आज होत आहे त्या प्रत्येक विचारधारेंत कांहीं फायदे व कांहीं तोटे असल्यामुळें, मीं त्या संघर्षावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. कोणतीहि विचारसरणि पूर्णपणें चांगली वा पूर्णपणें वाईटहि नाहीं. प्रत्येकांतील

पान क्र. ०६



हितकर गोष्टी निवडून काढण्याचा प्रयत्न करणें जरुर आहे. अशा हितकर गोष्टी व तत्त्वें घेऊनच सर्वांची एकत्र, व्यवहार्य व सुसंवादी बांधणी केली पाहिजे. पण अगदीं विरुद्ध टोकांच्या मतांचा समन्वय करण्यासाठीं एकादी व्यवहारी चौकट तयार करण्याचें सामर्थ्य मजजवळ नव्हते व अशी उपाययोजना व्यवहारांत आणण्याचें सामर्थ्य तर नव्हतेंच नव्हतें.

राष्ट्रांराष्ट्रांत शांतता, सलोखा व मैत्री नांदावी व सर्वांनीं जगत्कल्याणाकरितां सहकार्य करावें अशी माझी मोठी मनीषा होती. परंतु माझ्या सामर्थ्यापेक्षांहि महान् सामर्थ्य असलेल्या कोणीतरी शक्तीने मला युद्ध करावयास लावलें व वाटेल त्या पापमूलक साधनांनीं आणि अनुदार व दुष्ट निर्णय घेऊन त्यांत यशस्वी होण्यास भाग पाडलें.

असें असूनहि मी फार मोठा मुत्सद्दी आहे असें म्हटलें जातें. भरघोंस स्तुति व मोठे मानसन्मान यांचा माझ्यावर वर्षाव होत आहे; आणि मानवजातीचा मित्र म्हणून मी मानला जात आहे.

परंतु मला माझ्या दोषांची चांगली जाणीव आहे. माझ्या बालपणांतील आशा-आकांक्षा सुफलित करून त्यांवर यशाचा मुकुट चढविण्यासाठी जें सत्यज्ञान किंवा जी खरी सत्ता पाहिजे होती ती मिळविण्याची संधि मी गमावली हेंहि मला माहीत आहे.

आतां माझा अंतःकाळ अगदीं समीप आला आहे. आपण फारच अल्प कार्य करूं शकलों व तेंहि आपण नीट करूं शकलों नाही, याची जाणीव मला आहे. मृत्यूचा उंबरठा ओलांडून पुढें पदार्पण करतांना माझें अंतःकरण व्यथित होत आहे व माझा भ्रमनिरास झाला आहे !

पान क्र. ०७



लेखक


या ऐहिक नश्वरतेंत जें सौंदर्य व जें सत्य स्पंदन पावत असतें तें, कल्पनेच्या पंखांनीं विहार करणाऱ्या शब्दांच्या साहाय्यानें हस्तगत करण्याचा मीं प्रयत्न केला. मानव व मानवेतर प्राणी, जीवजात व वस्तुजात, दृष्यें व घटना -- हा दृष्टीसमोर सभोंवार पसरलेला दृष्य-पट आणि भावना, संवेदना व चेतना यामध्यें तितक्याच प्रमाणांत विस्तारून राहिलेला दुसरा एक पट -- हे दोन्हीं मिळून एक गूढजालच बनून गेलेलें आहे, एक प्रकारची चक्रव्यूह रचना निर्माण झालेली आहे. या उभयविध पटांची संमोहिनी माझ्या मनावर पडली आणि मी ओळखावें, समजून घ्यावें व ग्रहण करावें एतदर्थ मला बोलावणारी त्याची 'हांक' मीं ऐकली; ती हांक दुसऱ्या कोणत्याहि 'एजियाच्या' किन्नरीपेक्षां मधुरतर आणि सक्तीनें आकर्षित करणारी होती. त्या हांकेतील निनादता माझ्या शब्दांमध्यें आणण्याचा मीं प्रयत्न केला.

वस्तुजातांतील गूढ रहस्य प्रतिपादन करण्याचें माझें ध्येय होतें. जणु 'स्फिंग्स' ला बोलावयास लावणें हें माझें उद्दिष्ट होतें. जें लपून बसलेलें आहे, जें सुप्त-गुप्त रूपानें वसत आहे, जें आपल्या गहन गूढतेंतून सूर्यमालिका, तारका नि अंतःकरणें यांना गति देतें

पान क्र. ०८



तें अनावृत करून स्वच्छ प्रकाशांत आणून मांडण्यासाठीं मी झटलों. ऐहिक आणि ऐहिकतेच्या अतीत असलेल्या घटनांच्या मागें चाललेलें कष्टपूर्ण कार्य म्हणजे एक मूक, एवढेच नव्हे तर अस्ताव्यस्त, कांहींसें गोंधळाचें असें, नाट्य आहे. मी त्या घटनांना वाचा आणि चेतना प्रदान केली. शब्द हें एक अत्यंत अद्‌भुतरम्य, अप्रतीम असें साधन मला वाटलें. या साधनाची रचनाच अशी बेताची कीं तीमुळें कशासहि साकारता आणि अभिव्यक्ति देतां यावी; संदिग्धता येण्याइतपत जशी तींत अस्थिरता नाहीं तसाच बोधकतेचा अभाव वाटण्याइतकी तींत घनताहि नाहीं. 'शब्दा'चा एकाच वेळीं दोन जगाशीं संबंध असतो. 'शब्द' हा जड जगतांतील असल्यानें तो जडतेचें रूप घेऊं शकतो, तसेंच सूक्ष्म घटना, शक्ती नि गती, तत्त्वें नि विचार यांच्याशीं संबंध प्रस्थापित करण्याइतकी पुरेशी अजडतादेखील त्याच्या ठिकाणीं असते. 'शब्द' अभौतिकास भौतिक रूप देतो, अमूर्तात मूर्त करूं शकतो; याहि शिवाय घटनांचा अर्थ, विशिष्ट 'रूपांच्या' मागें निहित असलेला यथार्थ आशयहि शब्दांमुळेंच आपणास प्राप्त होतो.

मानवी हृदयांतील किंवा सृष्टींतील उत्कंठा, त्यामध्यें चाललेल्या आक्रोशाचें -- अश्रूंचें प्रयोजन -- व्यक्ततेंत आणण्याचा प्रयत्न मीं माझ्या भावगीतांतून केला. भावगीतापेक्षां मोठ्या विस्तृत, असलेल्या दंतकथा व बोधकथा यांमधून जीवनाच्या लहरींच्या व तीव्र इच्छांच्या, दुर्मिळ ज्ञानाच्या आणि सार्वत्रिक मूढतेच्या विविध बाजू मी चित्रित केल्या. मनुष्यांतील व सृष्टींतील जाणीवेचा-चेतनेचा-विकास दाखविणारा इतिहास घडविणाऱ्या घटना-उपघटनांना वाङ्मयीन जिवंतपणा व अर्थपूर्ण प्रत्यक्षता

पान क्र. ०९



प्राप्त करून दिली. जीवनांतील शोकान्तिका व हर्षान्तिका यांना मीं नाट्यरूप देखील देऊन टाकलें. आधुनिक मानवी स्वभावाच्या गरजा नि अपेक्षा सुंदर तऱ्हेनें या प्राचीन वाङ्मय-प्रकाराच्या द्वारां परिपूर्ण केल्या जातात हें पाहून तुम्हाला किती आनंद झाला हें मीं सांगायला नको. सचेतन शक्तींनी प्रेरित झालेल्या व्यक्ती नि स्वभावैशिष्टयें, मीं अविस्मरणीय व्यक्तिचित्रणांतून साकार केलीं. या वाङ्मयप्रकारापेक्षांहि अधिक व्यापक आणि अधिक सुबोध असें साधन म्हणजे कादंबरी, आणि चालू युगांतील जी शास्त्रीय दृष्टि व चिकित्सक वृत्ति यांना कादंबरी हाच वाङ्मयप्रकार कदाचित् अधिक रुचणारा प्रकार होय. कारण या वाङ्मयप्रकाराला दृष्टांत व स्पष्टीकरण हीं दोन्हीं मानवतात. व्यक्तींचें जीवन-चरित्र आणि सामाजिक संघटनांचा इतिहास मी तुम्हांला सादर केला असून अखिल मानव्याचाहि जीवन-इतिहास, म्हणजे समग्र समाजाच्या परिवर्तिनी, चक्राकार, विकासमार्गानें आरोहण करणाऱ्या आंदोलनाचाहि इतिहास तुमच्यासाठी अंशतः ग्रंथगत करण्याचा मीं प्रयत्न केला, तथापि केवळ व्यापकता, विशालता -- विराट् साधर्म्य -- हा विषय मानवाच्या आत्मविकासास पुरेसा नाही, हें मीं ओळखलें, मला तसें मनोमन वाटलेंहि. मानवी आत्म्याला उच्चतर नेण्याची आवश्यकता असते. तदर्थ एका उदात्त शैलीची गरज असते. यासाठींच माझें महाकाव्य अवतरलें. उभ्या आयुष्याचें कष्ट खरोखर त्यासाठीं कारणीं पडले. परंतु तुमच्यापैकीं अनेकांना महाकाव्याच्या शैलींतील प्रभावी, जादुमय स्पंदन समजत नाहीं, आणि समजलें पण नाहीं. तें पाहून कित्येक नुसतें थक्कच होऊन गेले. तथापि

पान क्र. १०



सर्वांनीं तें अनुभवलें खास. खरेंच, आवरण भेदून सत्य शोधण्याचा तो एक निर्वाणीचा हताश प्रयत्नच होता.

मीं लेखन-विषयांत जशी विविधता आणली तशी शैलींतहि. एकाद्या पारंगत शास्त्रज्ञाप्रमाणें मी शब्दांची जादूहि करून पाहिली आहे; शब्दघटक कसें बदलावयाचें, जणु त्याचें रूपांतरच करून टाकावयाचें, एक निराळाच अर्थ, निराळाच ध्वनि, निराळेंच मूल्य शब्दांच्या अंगीं कसें आणून द्यावयाचें हें मी जाणलें. 'सिसेरो'चें शब्द-संगीतांतील आरोह दाखविण्याचें कौशल्य, 'मिल्टन'च्या काव्यांतील कल्पना-समृद्धि, 'रेसिन'च्या लेखनातील सौम्यता -- या प्रत्येकांतील कांहीं कांहीं वाङ्मय-गुण माझ्या लेखनांत कमी अधिक प्रमाणांत विशेषत्वानें झळकत, ‘वर्डस्वर्थ’च्या सर्वोत्तम काव्य-कृतींतील सरलता मला अशक्य नव्हती आणि ‘शेक्सपीअर’च्याहि लेखनांतील जादू मला अगदींच अज्ञात नव्हती. ‘वाल्मिकी’ची भव्यता नि ‘व्यासां’ची उदात्तता मला उत्तुंग गिर्यारोहणाप्रमाणें कधींच अशक्यप्राय वाटली नाहीं.

तरी देखील मला माझें प्राप्तव्य प्राप्त झालें नाहीं. मला सुख मिळालें नाहीं. मी असमाधानी आहे. कारण, कांहीं झालें तरी माझी वाङ्मयनिर्मिति म्हणजे एक स्वप्न-सृष्टीच -- ''पेरिलें स्वप्नबीज आकाशीं'' अशी स्थिति आहे. वस्तुमात्राच्या अंतरी असलेलें खरें सत्य मला गवसलें नाहीं, त्यांच्या आत्मिक सौंदर्याचें दर्शन मला झालें नाहीं असें मला वाटतें. फक्त बाह्यांग खरवडलें. निसर्ग-रमणीचें बाह्य वस्त्र मी कुरवाळलें. पण तिची देहकांति, तिच्या आत्म्याचें सौंदर्य माझ्या आकलनांतून नेहमीच निसटलें. वरवर कितीहि सत्य वाटोत, कितीहि आल्हाददायक

पान क्र. ११



वाटोत, माझ्या कलाकृती म्हणजे सृष्टि-नटीच्या अवयवांभोंवतीं कोळिष्टकें विणणेंच होतें. लेखनविषयाचा भेद करण्यास, तो उघड करण्यास, तो व्यक्त करण्यास व त्याला मूर्तरूप देण्यास जी सामुग्री, जें साधन मला एकदां स्वभावतःच निर्दोष नि परिपूर्ण वाटलें तेंच अखेरीस मला अपुरें वाटत आहे. एक प्रकारची प्रगाढ शांति, केवळ निःस्तब्ध मूकता हीच वस्तुमात्राच्या अंतरंगास निकटवर्ति अशी आहे असें मला सरते शेवटीं वाटलें.

या अविरत चाललेल्या ओघांत, या प्रचंड अस्थिरतेंत मी माझे असहाय बाहू उभारून ‘फास्टस’प्रमाणें आक्रोशून विचारत आहे -- ''हें अनंत-असीम निसर्गा ! कुठें कुठें तुला हस्तगत करतां येईल?'' ''रित्या अंतराळांत आपल्या तेजःपुंज सोनेरी पंखांची व्यर्थ फडफड करण्याचा परिणामशून्य प्रयत्न करणारा देवदूत'', असें दुसऱ्या एका कविराजाला एकदां संबोधण्यांत आलें होतें. पण आम्ही सारे साहित्यिक यापेक्षां रतिमात्रहि सरस नाहीं.

माझ्या आयुष्याच्या अखेरीस, बालकवत् अज्ञानानें कांहीं प्रश्न मी विचारत आहे -- या साऱ्या घटनांचा अर्थ तरी काय ? कोणत्या देवतेपुढें आम्ही आमचा माथा विनम्रभावानें नमवू आणि नैवेद्य समर्पू ? हृदयाच्या गाभाऱ्यांतील देवतेचें दर्शन कशा प्रकारचें असेल ?

कशासाठी जगलों, कशासाठीं मरावयाचें ? अवनितलावरील या साऱ्या क्षणभंगुर दृष्यांचा, या साऱ्या परिश्रमांचा नि धडपडीचा, एकीकडे दुःखांचे डोंगर दिसत असतांना इतरत्र लाभणाऱ्या यशाचा, अर्थ तरी काय ? थक्क करून टाकणारा आशावाद आणि विजयाच्या आनंदानें बहरलेला उत्साह यांच्या करवीं, कशानेंहि

पान क्र. १२



भरून काढतां येणार नाहींत असे अवचेतनेचे नि अज्ञानाचे खोल खंदकच खणले जातात याचा अर्थ काय ? आणि या साऱ्या नाटकाचा शेवट एकच ठरलेला : -- अदृष्य होणें, विलयास जाणें; दृष्य जगाच्या गूढतेपेक्षांहि अधिक गूढ असलेलें हें, अदृष्य होणें ! आणि हें गूढ म्हणजे कांहीतरी अविचारीपणाचाच प्रकार, एकाच वेळीं भयप्रद नि निरर्थक वाटणारी ही कठोर थट्टाच आहे कीं काय असेंच वाटूं लागतें.

पान क्र. १३



वैज्ञानिक


व्यावसायिक जीवनाला आरंभ करतांना तुम्हांपैकीं कांहींजणांचा उद्देश असा होता कीं, आपल्या बांधवांची परिस्थिति सुधारतां येईल अशा प्रकारचें जीवन पत्करावें; असा कांहीं हेतु धरून मीं माझ्या जीवनाला आरंभ केला नाहीं. माझी गोष्ट अशी आहे कीं, मला ज्ञानाचें -- कृतीपेक्षां ज्ञानाचें -- आकर्षण मुख्यत: होतें. ज्ञानाचें - म्हणजे आधुनिक स्वरूपाच्या ज्ञानाचें - अर्थात् भौतिक ज्ञानाचें - विज्ञानाचें. निसर्ग आणि मानव यांच्या दरम्यान निसर्गाचीं रहस्यें मानवापासून दडवून ठेवणारा, पडदा आहे; या पडद्याचा एकादा कोंपरा वर उचलून धरतां येणें, अर्थात् निसर्गाच्या गुप्त शक्तींविषयीं उपलब्ध ज्ञानापेक्षां थोडें अधिक ज्ञान मिळवितां येणें, यासारखा दुसरा मोठा चमत्कार असूं शकत नाहीं, असें मला वाटतें. मी न कळतच असें गृहित धरून चाललों होतो कीं, ज्ञान वाढलें कीं मानवाचें सामर्थ्य वाढलेंच पाहिजे; आणि निसर्गावर मानवाची सत्ता कोणत्याहि नव्या दिशेनें स्थापित झाली कीं, त्या सत्तेचा परिणाम म्हणून, केव्हां ना केव्हां मानवाच्या स्थितींत सुधारणा घडून आलीच पाहिजे, त्याचें भौतिक, तसेंच नैतिक जीवनहि वरच्या पायरीवर गेलेंच पाहिजे. विज्ञानाच्या

पान क्र. १४



अनेक शाखांचा पाया घालणाऱ्या, गेल्या शतकांत जन्मलेल्या, इतर सर्व विचारवंतांप्रमाणेंच मलाहि असें वाटत असें कीं, अज्ञान, निसर्गाविषयक अज्ञान, हेंच, आमच्या मार्गांतील एकच एक संकट नसलें तरी, प्रमुख संकट मात्र खास आहे. आम्ही मानव, पूर्णतेच्या मार्गानें जोराची वाटचाल करूं इच्छितों; पण अज्ञान हें आम्हांला मागें ओढून धरतें. मानवजातीमध्यें पूर्णतेची पात्रता कांहीं मर्यादित नाहीं, तिच्या प्रगतीला मर्यादाच नाहींत, ही गोष्ट आम्ही विचारवंत मान्य करीत होतो -- कांही चर्चा, वाद-विवाद न करतां मान्य करीत होतों. प्रगति केव्हां वेगानें होईल, केव्हां मंद गतीनें होईल, पण होत रहाणार हें निश्चित. येथपर्यंत आम्ही चालून आलों, तसें पुढेंहि चालत रहाणार. अर्थात् ज्ञानाच्या आधारानें आमचें असें सूत्र ठरून गेलें होतें कीं, ज्ञानांत वाढ झाली कीं समजुतींत वाढ होते, शहाणपणांत आणि न्यायीपणांत वाढ होते -- अर्थात् प्रगति होते.

या सूत्राप्रमाणें दुसरेंहि एक सूत्र आम्ही सत्य म्हणून गृहीत धरून चाललों होतो, पूर्ण विश्वासानें गृहीत धरून चाललों होतो. तें सूत्र हें कीं, विश्व वस्तुत: जसें आहे तसें आकलन होणें शक्य आहे. एकाद्या वस्तूचें ज्ञान करून घेतां येतें त्याप्रमाणें विश्वाच्या नियमांचें प्रत्यक्ष ज्ञान मिळविणें शक्य आहे. ही गोष्ट आम्हांला इतकी उघड, संशयातीत वाटत होती कीं, आम्ही तिजसंबंधानें कसलाहि प्रश्न उत्पन्न केलाच नाहीं. विश्व आहे, मी आहे -- आणि दोघांचें नियतकार्यच मुळी परस्परांचें ज्ञान करून घेणें हें आहे. विश्वाचा एक अंश मी आहे ही गोष्ट खरी, पण विश्वाचें ज्ञान करून घेतांना, विश्वापासून वेगळा होऊन मी त्याजकडे मजहून एक

पान क्र. १५



वेगळी वस्तु म्हणून पहात असतो. माझी भूमिका अशी कीं, निसर्गाचे नियम म्हणून ज्या नियमांना मी नांव देतो, ते अस्तित्वासाठीं मजवर अवलंबून नाहींत, माझ्या मनावर अवलंबून नाहींत; ज्या स्वरूपाचें दिसतात, त्याच स्वरूपाचे, इतरांनाहि, जे कोणी त्यांचें निरीक्षण करण्यास समर्थ आहेत त्यांनाहि, दिसतात.

शुद्ध ज्ञानाचें हें ध्येय समोर ठेवून, त्या ध्येयापासून प्रेरणा घेऊन मी माझ्या अभ्यासाच्या व्यवसायास आरंभ केला. मी अभ्यासासाठीं पदार्थविज्ञान या शास्त्राची निवड केली. विशेषत: अणु, किरणोत्सर्ग यांचा अभ्यास मी करूं लागलो. बेकेरेल आणि क्युरी यांनीं या अभ्यासाच्या कार्यांत राजमार्ग आंखून ठेवला होताच. तो काल असा होता कीं, स्वाभाविक किरणोत्सर्गाची जागा कृत्रिम किरणोत्सर्गानें घेतली होती. किमयाशास्त्रांतील स्वप्नें वास्तवतेंत येत होतीं. युरेनियमचा अणु फोडण्याची प्रक्रिया ज्या बड्या वैज्ञानिकांनीं शोधून काढली, त्यांच्याबरोबर मीं काम केलें, अॅटम बाँबच्या जन्माच्या वेळीं मी उपस्थित होतो; त्याच्या जन्मदात्यांत मीहि एक होतो. चिकाटीनें, एकाग्रतेनें केलेलें कित्येक वर्षांचें आमचें कठीण काम अॅटम बाँबच्या रूपानें फळास आलें. अॅटम बाँबच्या जन्मकाळाच्या आगेमागें मला एक कल्पना सुचली; त्या कल्पनेच्या आधारें प्रयोग करून मीं एक शोध लावला -- हा माझा पहिला शोध. या शोधामुळेंच आज आम्हांला अणुकेंद्रगत शक्तीपासून प्रत्यक्षपणें विद्युत् शक्ति काढतां येऊं लागली आहे. या शोधानें सगळ्‌या जगाच्या आर्थिक व्यवहारांत क्रांति घडवून आणली आहे, हें तुम्हांला ठाऊकच आहे. या क्रांतीचें कारण असें कीं, या शोधामुळें यंत्रचालक शक्ति सर्वांना मिळण्याइतकी स्वस्त

पान क्र. १६



झाली आहे. या शोधानें खूपच खळबळ उडवून दिली; कारण, त्यानें माणसाला काबाडकष्टाच्या शापांतून मुक्त केलें, घाम गाळावा तेव्हां भाकरी मिळणार, यामुळें कष्ट करण्याची जी निकड माणसाला होती, तिच्यापासून या शोधानें त्याला मोकळें केलें.

माझ्या तारुण्यांत जें स्वप्न मी मनांत खेळवीत होतो, तें स्वप्न, एक मोठा शोध लावण्याचें स्वप्न, आतां साकार झालें होतें; आणि या साकार स्वप्नाचें मानवजातीला फार महत्त्व वाटत होतें हेंहि मीं पाहिलें. मानवजातीला माझ्याकडून एक मोठी व लाभाची गोष्ट, जणु एक मोठा वर, प्राप्त झाला होता. माझ्याकडून असें कांहीं घडून येईल अशी, अर्थात् माझी मुळींच अपेक्षा नव्हती, त्यासाठीं माझी धडपडहि नव्हती.

हें सर्व घडलेलें पाहून मला समाधान वाटलें; पूर्ण समाधान वाटलें; अर्थात् तें सकारण वाटलें. पण हें समाधान फार थोडा वेळ टिकलें. कारण पहिल्या शोधानंतर लवकरच मला दुसरा शोध लागला आणि या शोधानें माझें समाधान नाहींसें केलें. या शोधाची गोष्ट मी तुम्हांस आतां सांगतो. कारण आपण सर्व आतां मरणाच्या जबडयांत आहोंत, आणि माझा शोधहि -- माझ्या शोधाचें रहस्यहि -- माझ्याबरोबरच नाहींसें होणार आहे. असो, माझा दुसरा शोध, तांबे, अॅल्युमिनियम यांसारख्या सामान्य धातूंच्या अणूपासून अणुशक्ति मोकळी करण्यासंबंधीं होता; युरेनियम्, थोरिअम् आणि दुसरें कांहीं विरळा सांपडणारे धातु आणि तांबें, अॅल्युमिनियम यांसारखे पुष्कळसे सामान्य धातु, या सर्वांचेच अणु फोडून अणुशक्ति मोकळी करण्याची प्रक्रिया मला सांपडली होती. हा शोध लागल्यावर माझ्यापुढें एक भयंकर प्रश्न उभा राहिला. या

पान क्र. १७



प्रश्नानें माझ्या मेंदूला एवढा ताण पडला कीं मी जवळ जवळ वेडा झालों. मी आपला शोध प्रसिद्ध करावा कीं न करावा हा माझ्या पुढला भयंकर प्रश्न होता. अद्यापि माझ्याखेरीज हा शोध, या या शोधाचें रहस्य, कोणालाहि ठाऊक नाहीं.

अॅटमबाँबचा प्रताप तुम्हां सर्वांना माहीतच आहे. तुम्हांला माहीत आहे कीं, त्या बाँबनंतर आतां हैड्रोजन बाँब निघाला आहे. या बाँबची संहारशक्ति, विध्वंसनशक्ति अॅटम बाँबपेक्षां अनेक पटीनें मोठी आहे. तुम्हांला माझ्याप्रमाणें हेंहि ठाऊक आहे कीं, मानवजात या शोधांच्या धक्क्यानें गडबडून गेली आहे, भीतीनें हादरून गेली आहे. मानवजातीच्या हातांत या शोधांनीं, पूर्वी केव्हांहि नव्हती इतकी, विध्वंसक शक्ति आणून ठेवली आहे. त्यांत आणखी मी माझा शोध प्रसिद्ध केला, मी माझें रहस्य उघडें केलें तर त्यायोगें एक राक्षसी शक्ति कोणाहि सामान्य माणसाच्या हातांत मी दिल्यासारखें होईल. कोणतेंहि सरकार या राक्षसी शक्तीवर कसलेंहि नियंत्रण ठेवूं शकणार नाहीं. युरेनिअम् आणि थोरिअम् यांची मक्तेदारी सरकारांकडे सहज येऊं शकली, कारण एकतर हे धातु फार थोडया प्रमाणांत आणि थोडया ठिकाणीं सांपडतात आणि दुसरें या धातूंना अॅटमबाँबचे स्वरूप देण्यास महाप्रयास पडतात. परंतु अशी कल्पना करा कीं, पॅरिस, लंडन, न्यूयार्क उडवून देण्याचें सामर्थ्य असणारें अण्वस्त्र कसल्याहि मोडक्या तोडक्या प्रयोगशाळेंत, कोणीहि गुन्हेगार किंवा वेडसर आततायी माणूस निर्माण करूं शकेल, अशी प्रक्रिया सर्वत्र प्रसिद्ध झाली -- अर्थात् मीं शोधून काढलेली प्रक्रिया प्रसिद्ध झाली - तर - तर कल्पना करा काय होईल ! माझ्या शोधाची प्रसिद्धि म्हणजे मानवजातीची

पान क्र. १८



इतिश्री करणारा आघात ठरणार, यांत कांहीं संशय आहे काय ? माझ्या शोधाच्या असह्य भारानें माझे हातपाय लटपटले, मला भोंवळ आली. माझा शोध मी प्रसिद्ध करूं, कीं नको करूं, या द्विधावृत्तींत खूप काळ मीं घालविला आहे; अद्यापीहि माझा निश्चय होत नाहीं -- माझी बुद्धि आणि माझें हृदय या दोघांनाहि संमत होईल असा निर्णय अद्यापीहि मला सुचत नाहीं.

मी तरुण वैज्ञानिक असतां निसर्गाचीं रहस्यें उकलण्याचा व्यवसाय सुरु केला, तो एका गृहीत गोष्टीवर -- गृहीत सूत्रावर -- पूर्ण विश्वास ठेवून सुरूं केला. तें माझें सूत्र आतां मोडून पडलें आहे, खोटें ठरलें आहे. ज्ञानांत सर्व प्रकारें वाढ झाली कीं मानवाच्या सामर्थ्यांत वाढ होते, हें खरें असलें तरी त्यामुळें मानवजातींत आपोआप सुधारणा, होते, नैतिक सुधारणा होते ही गोष्ट खोटी आहे. विज्ञानांतील प्रगति, आपणांबरोबर नैतिक प्रगतीलाहि अवश्यमेव घेऊन येते, ही कल्पना खोटी आहे. भौतिक शास्त्रांचें ज्ञान, बुद्धीनें मिळविलेलें, बुद्धि वाढविणारें ज्ञान, मानवी स्वभावांत बदल करण्यास असमर्थ आहे; तथापि आज हेंच ज्ञान आमची निकडीची गरज होऊन बसलें आहे. मानवाच्या प्रस्तर युगांत, त्यांच्या स्वभावांत जो लोभ आणि जो क्रोध होता तो आजहि जवळ जवळ तसाच आणि तितकाच आहे. आतांहि हा क्रोध, लोभ तसाच राहणार असेल तर मानवजातीचा विनाश अटळ आहे. मानवजात आज अशा एका स्थानावर येऊन पोहोंचली आहे कीं, तिच्यांत शीघ्र आणि समूळ नैतिक परिवर्तन झालें नाहीं, तर तिच्या हातांत असलेल्या शक्तीचा उपयोग ती आपला सर्वनाश करून घेण्याकडे करील.

तरुणपणीं दुसऱ्या एका सूत्राचें सत्यत्व गृहीत धरून मी

पान क्र. १९



कामाला लागलो होतो. त्याची काय गत झाली आहे ? विशुद्ध ज्ञानाचा आनंद तरी मला लाभला कां ? माझी अशी खात्री आहे कां, कीं निसर्गाच्या यंत्राची, गुप्त साधनसंभाराची, थोडीशी तरी चांगली, पूर्ण, ओळख मला झाली आहे ? अशी मला आशा तरी करतां येईल कां, कीं निसर्गाचें शासन करणाऱ्या खऱ्या नियमांचें ज्ञान मिळविल्याचा आनंद मला भोगतां येईल ? अरेरे ! माझ्या दुसऱ्या ध्येयसूत्राची पहिल्या सारखीच गत झाली आहे; माझें ध्येय मला साधलें नाहीं आणि साधणारहि नाही अशी मला भीति वाटते..... कारण, आम्हीं विज्ञानाच्या ज्ञानी भक्तांनीं ही कल्पना कधींच टाकून दिली आहे कीं, उपपत्ति एक खरी तरी असली पाहिजे किंवा खोटी तरी असली पाहिजे -- बरोबर तरी असली पाहिजे किंवा चुकीची तरी असली पाहिजे. आम्ही आतां एवढेंच म्हणत असतों, कीं, अमुक उपपत्ति सोईची आहे, वास्तव गोष्टींशीं जुळती आहे, त्यांचें कामचलाऊ स्पष्टीकरण देणारी आहे. पण जर, ती खरी आहे कां ? निदान, ती वस्तूचें किंवा वस्तुस्थितीचें वास्तविक स्वरूप सांगणारी, वास्तविक स्वरूपाशीं एकरूप तरी आहे कां ? असा प्रश्न केल्यास त्याचें उत्तर देणें अवघड आहे; अशक्यच आहे म्हणाना ! मला असला प्रश्नच अर्थशून्य वाटूं लागला आहे. गोष्टी त्याच आणि त्यांचें सारखेंच समाधानकारक स्पष्टीकरण देणाऱ्या उपपत्ती अनेक असूं शकतात; नव्हे, अनेक गोष्टींच्या बाबतींत आहेत, अशी वस्तुस्थिति आहे. अर्थात् या सर्वच उपपत्ती ''बरोबर'' समजणें भाग असतें. अखेर या उपपत्ती म्हणजे तरी काय ? त्या केवळ प्रतीकरूप असतात. या उपपत्तींच्या प्रतीकांचा खरा उपयोग हा कीं, त्यांमुळें आम्हांला कांहीं

पान क्र. २०



गोष्टी, घडण्याच्या अगोदर, त्या घडतील असें सांगतां येतें. गोष्टी 'कशा' घडतात हें वैज्ञानिक उपपत्ती आम्हांला दाखवूं शकतात, परंतु त्या तशाच 'कां' घडतात, तशाच 'कां' असतात हें त्या स्पष्ट करूं शकत नाहींत; मूळ सत्याकडे त्या आम्हांला नेऊं शकत नाहींत. वास्तविक, मूळ वस्तूच्याच शोधांत वैज्ञानिक असतो. या शोधांत असणाऱ्या वैज्ञानिकाला नेहमीं असेंच वाटत राहतें कीं आपण सत्याच्या भोंवती आहों, भिन्न भिन्न दृष्टिकोन, भिन्न भिन्न दृष्टिबिंदू वापरून सत्याच्या जवळ पोंचण्याचा प्रयत्न करीत आहों; पण या सत्याच्या शोधांत आपल्याला यश म्हणून केव्हांहि येत नाहीं; तें कांहीं आपल्याला सांपडत नाहीं. त्याचें पूर्ण आकलन कांहीं आपल्याला होत नाहीं. त्या सत्यानें आमची अगतिकता पाहून, आमच्या व त्याच्या मधला पडदा फाडून, आम्हांला दर्शन द्यावें असेंहि वाटतें -- पण तेंहि त्याच्याकडून घडत नाहीं.

मूळ सत्यासंबंधानें ही गोष्ट झाली. आतां, बाह्य विश्वासंबंधानें वैज्ञानिकाला खरें ज्ञान कितपत मिळूं शकतें तें पाहूं. आम्ही विश्वाची मापें घेतों, आणि या मोजमापानें बाह्य विश्वाविषयीं खरें ज्ञान होईल अशी अपेक्षा करतों. पण हीं मापें घेण्यासाठीं, माप घेणारा लागतो. मापें घेण्याची ही क्रिया अगदीं अल्प प्रमाणांत कां होईना विश्वाचें स्वरूप बदलण्यास कारण होते. बाह्य घटनांत केवळ मापें घेण्याच्या क्रियेनें देखील कमी अधिक स्थानांतर किंवा रूपांतर घडून त्यायोगें विश्वाच्या चित्रांत कांहीं तरी कमी अधिक घडून येतें. अर्थात्‌च आमच्या विश्वविषयक ज्ञानामध्यें संशयाला जागा रहाते. आमच्या मापांवरून विश्वाची स्थिति काय असेल हें आम्ही सांगू शकतो, पण 'अशीच स्थिति

पान क्र. २१



आहे' असा निर्वाळा आम्ही केव्हांहि देऊं शकत नाहीं. अर्थात् आमचें महान् विश्व आणि अतिसूक्ष्म अणुविश्व या दोन विश्वांची गोष्ट सारखी नाहीं. आमच्या जीवनाच्या महान् विश्वांत घटना मोठ्या असतात आणि मोजमापाच्या क्रियेमुळें त्यांत घडून येणारी अनिश्चितता दुर्लक्ष करण्यासारखी असते; पण अणुविश्वांत मोजमापाच्या क्रियेनें येणारी संशयास्पद स्थिति दुर्लक्ष करण्यासारखी बिलकूल नसते. अणुविश्वांत अणुविषयक खरें खरें ज्ञान मिळविण्याच्या आड, अणूंचा व माणसांचा स्वभावधर्मच येतो. ही अडचण दूर करणें माणसाला केव्हांहि शक्य नाहीं. खरें ज्ञान मिळविण्याची स्वभावगत अपात्रता दूर करण्याची आशा, आम्हांला केव्हांहि धरतां येणार नाहीं. वस्तुजाताच्या प्रकृतींतच ही अपात्रता आहे. आमच्या परीक्षण पद्धतींतील अपूर्णतेमुळेंच केवळ ही अपात्रता उत्पन्न होते असें नाहीं. इत्यर्थ असा कीं, आम्ही विश्वाचा अभ्यास करतो तो रंगीत चष्म्याचा उपयोग करून करीत असतों, आणि हे रंगीत चष्मे टाकून देणें हें आम्हांला केव्हांहि शक्य होणार नाहीं. मीं घेतलेलीं मापें, त्यांच्या आधारावर मीं बसविलेल्या उपपत्ती, या सर्वांत, बाह्य विश्व आहे हें जितकें खरें, तितकेंच त्यांत 'मी', 'माझा स्वभाव', 'माझें मानवी' मन आहे, हेंहि खरें आहे. तीं मोजमापें, तें सिद्धांत जसे वस्तुनिष्ठ असतात तसे ते व्यक्तिनिष्ठहि असतात, कदाचित् ते व्यक्तिनिष्ठच अधिक प्रमाणांत असण्याचा संभव आहे -- ते केवळ माझ्या मनांतच अस्तित्वांत असतील, त्या मोजमापांचें व सिद्धांतांचें बाह्य अस्तित्व हा केवळ माझ्या मनाचाच खेळ असेल.

अनंताच्या किनाऱ्यावर फिरत असतां, एक पावलाचा ठसा

पान क्र. २२



माझ्या दृष्टीस पडला. त्या पावलाच्या ठशावरून, तें पाऊल, ज्या कोणीं वाळूत उमटवलें तो कोण असावा, कसा असावा असा मनांत खल करून त्याची मूर्ति माझ्या डोळ्यासमोर उभी करण्याचा मीं प्रयत्न केला : मला या प्रयत्नांत शेवटी यश आलें. मीच तो प्राणी आणि माझेंच तें पाऊल असें मला शेवटीं आढळून आलें. हा असा मी येथें आहे. -- हे असे आपण सर्व येथें आहों. या परिस्थितींतून बाहेर पडण्याचा कोणताहि मार्ग मला दिसत नाहीं.

तथापि आशेचा एक किरण मला आशा देत आहे. विश्वासंबंधीं माझें जें ज्ञान आहे त्यांत पूर्ण निश्चित अशा गोष्टी मुळींच नाहींत; आहेत त्या सर्व गोष्टी कमी अधिक संभाव्य अशा आहेत. ही जी माझ्या ज्ञानाची वास्तविक स्थिति, तिजमुळेंच कदाचित् माझ्यासमोर आशेचा किरण आहे; तो मला आधार देत आहे. मला अशी आशा आहे कीं मानवजातीचें भवितव्य अमुकच, असा कांहीं कायमचा शिक्कामोर्तब झालेला नाहीं. मानवजातीचा संभाव्य सर्वनाश कदाचित् टळेलहि !

पान क्र. २३



कलावंत


मी एका मध्यम वर्गीय, सन्मान्य अशा कुटुंबांत जन्मास आलों. त्या कुटुंबांतील मंडळी कला म्हणजे एक हौशीचा, रिकामपणाचा उद्योग मानीत, व्यवसाय म्हणून नव्हे; आणि कलावंत म्हणजे विशेष विचार-गांभीर्य नसलेले, दुर्व्यसनाकडे झुकलेले, धनसंपत्तीची अवगणना करणारे, एकप्रकारें भयंकर प्राणी अशी त्यांची कल्पना असे. कदाचित् केवळ विरोध करावयाच्या वृत्तीमुळेहि असेल, मी चित्रकार झालोंच पाहिजे अशी अगदीं आतून मला आवश्यकता वाटूं लागली. माझें सारें भान माझ्या नेत्रांत केंद्रित झालें. माझ्या स्वतःच्या भावना-विचार शब्दांतून व्यक्त करण्यापेक्षां कागदावर रूपरेषेच्या साह्यानें व्यक्त करणें मला अधिक सुलभ वाटूं लागलें. ग्रंथाच्या वाचनापेक्षां चित्रांच्या अवलोकनानेंच मी कितीतरी अधिक चांगल्या प्रकारें शिकलों. एकदां माझ्या दृष्टिपथांत जें आलें -- निसर्गसुंदर भूभाग, मानवी चेहरे अथवा चित्रें -- तें माझ्या स्मरणांतून कधींच लोपलें नाहीं.

तेराव्या वर्षापर्यंत बरेंच कष्ट करून मीं चित्रकलेचें, जलमिश्रित रंगकामाचें, खडूच्या रंगकामाचें आणि तैलरंग कामाचें तंत्र जवळ जवळ आत्मसात् केलें होतें. यानंतर आईवडिलांच्या मित्रां-

पान क्र. २४



च्यासाठीं व ओळखीच्या माणसांच्यासाठीं पैसे घेऊन कांहीं काम करण्याची मला संधि आली; अशा रीतीनें मला पैसा मिळू लागल्यावर मात्र, कुटुंबांतील मंडळी देखील माझ्या व्यवसायाचा आस्थेनें विचार करूं लागली. तेव्हां कलेचा सर्वांगीण व्यासंग करण्याची हीहि संधि मी साधली, आणि आवश्यक ती वयोमर्यादा गांठल्यावर मी 'ललित कला-भुवनांत' नांव दाखल केलें. जवळ जवळ लगेच 'प्रिक्स द् रोम' या स्पर्धेंत मी भाग घेतला आणि पहिला क्रमांक मिळविला. विजयश्रीनें विराजित झालेल्या कलावंतांत वयानें मी सर्वांत लहान. त्यायोगें इटालियन कलेशीं पूर्ण परिचय करून घेण्याची संधि मला लाभली. नंतर पुढें प्रवास खर्चासाठीं एक शिष्यवृत्ति मिळाल्यामुळें मी स्पेन, बेल्जियम, हॉलंड, इंग्लंड आणि इतर देशांस जाऊन आलों. एकाद्या विशिष्ट काळापुरता किंवा एकाद्या सांप्रदायाचा अनुयायी होऊन रहावें अशी माझी इच्छा नव्हती. निरनिराळ्या देशांत ही कला ज्या स्वरूपांत प्रचलित होती त्याचा अभ्यास मीं केला, तसेंच या कलेचे निरनिराळे सारे प्रकार, पौर्वात्य नि पश्चिमात्य प्रकारहि, मीं अभ्यासिले.

त्याबरोबरच माझी स्वतःची कलानिर्मिति चालूंच होती. कलाविषयक एकादें अभिनव सूत्र शोधून काढण्याचा माझा प्रयत्न होता. पुढें भव्य यश, कीर्ति मला लाभली. प्रदर्शनांत पहिल्या क्रमांकांची पारितोषिकें, ज्युरीचें सभासदत्व, जगांतील मोठ्यांत मोठ्या अशा संग्रहालयासाठीं माझ्या कलाकृतींची खरेदी, चित्रविक्रेत्यांमध्यें माझ्या कलाकृतीविषयीचें वेड ! संपत्ति, पदव्या, मानसन्मान यांची खैरात झाली. 'प्रतिभासंपन्न अद्वितीय कलावंत' म्हणून देखील माझा उल्लेख झाला. हें सर्व झालें तरी मला

पान क्र. २५



समाधान मात्र नाहीं. अद्वितीय प्रतिभासंपन्नतेची माझी कल्पना अगदींच वेगळी आहे. एक नवीन प्रकारचें उच्चतर नि शुद्धतर, अधिक सत्य नि अधिक उदात्त सौंदर्य व्यक्त करण्यासाठीं अभिनव साधनांनीं आणि पद्धतींनीं अभिनव अशी कला निर्मिली पाहिजे. पण जोंवर मानवतेचें जूं माझ्या मानेवर आहे असें मला वाटत आहे, तोंवर मी जड सृष्टीच्या आकाररूपाच्या पाशांतून पूर्णपणें मोकळें होणें मला शक्य वाटत नाहीं. माझ्या ठिकाणी आकांक्षा असली तरी, तिची परिपूर्ति करण्यास लागणाऱ्या ज्ञानाची, द्रष्टेपणाची मात्र उणीव भासत आहे.

आतां तर आयुष्याची अखेर येऊन ठेपली आहे. मला वाटत आहे कीं, मला ज्या प्रकारची कलाकृति निर्माण करावीशी वाटत होती, तसें कांहींच माझ्या हातून निर्माण झालें नाही आणि ज्या प्रकारची नवनिर्मिति मी करूं इच्छित होतो, त्यांतील अणुमात्रहि साध्य झालें नाही. माझ्यावर कीर्ति-पुष्पांचा वर्षाव झाला असला तरी देखील, मी अपयशीच ठरलों आहे असें मला वाटतें.

पान क्र. २६



कारखानदार


आपण सर्वच आपलीं अंतःकरणें खुलीं करून सांगतों आहों. माझ्याशीं स्पर्धा करणारांना किंवा माझ्या यशाबद्दल -- तथाकथित यशाबद्दल -- हेवा करणारांना, मी जें सांगणार आहे त्याचा उपयोग करतां येणें शक्य नाहीं म्हणून, मी माझ्या आयुष्याची कहाणी सांगतो. आजपर्यंत माझ्या सारख्यांची जीवनकथा जशी बहुश: सांगितली जाते त्या पद्धतीनें नव्हे तर माझ्या अनुभवानुसार मी ती सांगणार आहे.

माझ्या आयुष्यांतील खऱ्या गोष्टी यथार्थपणें मी तुमच्यापुढें ठेवत आहे. माझे वडील एका लहानशा खेडेगावांत लोहार होते. लोहारकाम किंवा धातूकाम करण्याची आवड मला त्यांच्याकडूनच आपोआपच मिळाली. काम चांगल्या रीतीनें करण्यापासून कसा आनंद होतो आणि आपण अंगिकारलेलें काम, त्यांत सर्वस्व ओतून कसें करावें, हेंहि मला त्यांनींच शिकविलें. तसेंच, कोणतेंहि काम पूर्वींपेक्षां आणि इतरांहून अधिक चांगलें करावें हेंहि मी त्यांच्या पासूनच शिकलो. नफा हें त्यांचें मुख्य उद्दिष्ट नव्हतें, परंतु आपल्या व्यवसायांत श्रेष्ठ असल्याचा त्यांना अभिमान वाटे आणि ते आपल्या स्तुतीनें फुलून-खुलून जात.

पान क्र. २७



या शतकाच्या प्रारंभीं स्वयंगत ज्वलनशील एंजिन जेव्हां निर्माण झालें, तेव्हां आम्ही लहान मुलें, त्या एंजिनाच्या संभाव्य सामर्थ्यामुळें आणि त्यांतून कितीतरी गोष्टी निष्पन्न होण्याच्या शक्यतेमुळें खरोखरीच वेडावून गेलों होतो; आणि घोडयाशिवाय चालणारी गाडी किंवा मोटार म्हणा, निर्माण करण्यासाठीं अपार परिश्रम करण्याची आम्हांला त्यामुळें प्रेरणा झाली. त्या आधींच बाहेर पडलेले तशा गाड्यांचे नमुने बिलकूल परिपूर्ण नव्हते.

इकडून तिकडून जमा केलेल्या गाडीच्या भागांतून मीं माझ्या हातांनीं जेव्हां एक मोटारगाडी बनविली -- अर्थात् ते जमा केलेले भाग मोटार बनविण्यासाठीं वापरावयाचे असें मीं केव्हांच योजिलें नव्हतें -- तेव्हां मला आतांपर्यंतच्या आयुष्यांतला सर्वांत मोठा आनंद झाला यांत शंका नाहीं. मोटार चालविण्याच्या जागेवर कसेंबसें बसून माझ्या वडिलांच्या दुकानापासून टाऊन हॉलपर्यंत मी काहीं शें दोनशे यार्ड गेलो. भकभक आणि खटखट करणारें या यंत्राहून दुसरें कांहीं चांगलें, सुंदर असेल असें मला तेव्हां वाटलेंच नाही; मात्र ती गाडी पाहून कुत्रे भुंकत होते, घोडे खिंकाळत होते आणि रस्त्यावरून चालणारांना आपले प्राण धोक्यांत असल्याप्रमाणें भीति वाटत होती.

त्यानंतरची कित्येक वर्षांची हकीकत मी सोडून देतो. परमेश्वरानें गाडी ओढण्यासाठीं घोडा निर्माण केला आहे; अशा स्थितीत रेल्वे निर्माण करून आधींच अधर्म झाला असताना रस्ते आणि शहरें यांमध्यें असल्या राक्षसी शोधांची गर्दी करणें हें अधिक पाप आहे असें म्हणून शत्रूत्व करणारांचीहि हकीकत मी सांगत नाहीं. तज्ज्ञ किंवा एकमार्गी, दक्ष व्यक्तींनाच चालवितां

पान क्र. २८



येतील अशा लहरी वाहनांना कांहीं विशेष भवितव्य नाहीं, असें आणखी कांहीं जणांना वाटत होतें. तरीपण कांही साहसी व्यक्तींनीं मला लहानशी यंत्रशाळा उभारण्यासाठीं, थोडेसें पोलाद खरेदी करण्याकरतां आणि कांहीं रोजगारी कामावर लावतां यावेत म्हणून थोडेसे डॉलर्स उसने दिले. परंतु साधनहीन आणि विरोधी देशांत, अनिश्चित आणि अंधकारमय नशीबाच्या शोधांत जाणाऱ्या, सोन्याच्या शोधकांइतकीच त्यांचीहि निष्ठा आंधळी होती. मी कांहीं नशिबाच्या शोधांत नव्हतो. सहज हाताळतां चालवितां येईल आणि बाजारांत असलेल्या मोटारीपेक्षां स्वस्त मोटार तयार करण्याचें समाधान मला मिळेल, यासाठीं मी प्रयत्न करीत होतो. हें वाहन अधिक काटकसरीचें आणि परवडेल असें होईल असें मला वाटे; कारण तें चालू राहील तेव्हांच त्याचेवर खर्च करावा लागेल. घोडे सांभाळण्याला खर्च करावा लागतो म्हणून घोडे ठेवण्यास जे कां कूं करीत होते, तेहि लोक, या वाहनाची किंमत कमी ठेवतां आली तर, ही मोटार घेतील अशी माझी खात्री होती.

मीं मोठ्या प्रमाणांत निर्माण केलेला नमुना अद्यापहि लोकांच्या स्मरणांत आहे. खेडयांतील रस्त्यावर चालावें म्हणून त्याचीं चाकें उंच करण्यांत आलीं होती. शेतावर काम करणाऱ्या मजुराच्या धकाधकींत टिकावा इतका बळकट तो नमुना तयार करण्यांत आला होता. परंतु, मोटारगाडी म्हणजे धनिक लोकांसाठीं असलेली ऐषारामाची वस्तु आहे, अशी ज्यांची समजूत होती त्यांनीं त्या नमुन्याला नाकंच मुरडलीं. हा नमुना इतका सुकर होता कीं तो चालविण्याला जवळ जवळ कांहीच श्रम लागत नसत. त्यामुळें कोणतीहि उत्कृष्ट गाडी, अगदीं अननुभवी माणसाला

पान क्र. २९



सुद्धां हांकतां येईल, अशी आशा निर्माण झाली.

तथापि पहिलें महायुद्ध होईपर्यंत या मोटारगाडीला घोडयावर विजय मिळवितां आला नाहीं. अॅम्ब्युलन्स आणि दारुगोळ्‌याची वाहतुक जलद करावी लागे आणि तें सर्व साहित्य अत्यंत अवजड यंत्रांचें असें. त्या काळांत माझ्या कारखान्यांतील कामानें वेगाचा उच्चांक गांठला. लष्कराकरतां मोठ्या प्रमाणांत मालाची मागणी आल्यानें साहित्य सुधारण्याची आणि यंत्र बनविण्याची व तें जुळविण्याची पद्धति सर्वांगपूर्ण करण्याची संधि मला मिळाली.

महायुद्धाच्या शेवटीं माझा कारखाना अगदीं सुरळित चाललेला होता. परंतु नागरिकांच्या गरजांच्या दृष्टीनें तो प्रमाणाहून फार मोठा होता. त्यामुळें माझ्या हाताखालच्या लोकांना भीति वाटूं लागली. उत्पादनाचें प्रमाण कमी करावें, कांहीं नोकरवर्गाला बडतर्फ करावें, कांहीं कच्च्या मालाची मागणी रद्द करावी आणि मोटार गाडयांना मागणी कोणत्या प्रमाणांत येते तें पहावें, असा माझ्या सहकाऱ्यांनी मला आग्रह चालू ठेवला. त्यांचें हे सांगणें शहाणपणाचें होतें, यांत शंका नाहीं. परंतु सबंध जगांत सर्वांत स्वस्त गाडी बनविण्याची, पुन्हां न येणारी, हीच संधि होती. उत्पादन कमी करणें म्हणजे मोटारी महाग बनविण्यासारखें होतें. खपेल त्याचें उत्पादन करणें, हा खरा प्रश्न नसून, आपण निर्माण करूं त्या गाडयांची विक्री करणें, हाच खरा प्रश्न आहे, अशी मीं मनाशीं खूणगांठ बांधली. सहाच महिन्यांत, प्रसिद्धीसाठीं जाहिरातीची जोरदार मोहीम करून, मीं माझा मुद्दा सिद्ध केला.

त्यानंतर माझ्या कारखान्याच्या कामाचें पाऊल आपोआपच पुढें पुढें पडत चाललें. माझ्या हाताखालच्या नोकरांवर महत्त्वाचे

पान क्र. ३०



निर्णय घेण्याचें काम अधिकाधिक सोपविणें मला भाग पडूं लागलें, आणि मी मात्र मार्गदर्शक तत्त्वें तेवढीं सांगूं लागलो. मालाची गुणवत्ता आणि दर्जा कमी होऊं न देतां स्वस्त किंमतींत, खर्चांत माल तयार करणें आणि हेंहि पगार, मजुरी कमी न करतां; हीं माझीं तत्त्वें होतीं. माझ्या कामगारांना, जगांत कुठेंहि नाहीं इतकी मजुरी मिळावी असें माझें तत्त्व होतें. नवें नवें गिऱ्हाईक मिळावें यासाठीं आतां तें अगदीं खालच्या थरांतून मिळवावें लागे; आणि म्हणून मोटारी कमींत कमी किंमतीत विकतां याव्यात, असें मीं ठरवून दिलें होतें. धंद्याच्या अर्थघडीचा समतोल बिघडणार नाही अशा तऱ्हेनें नफ्याचें प्रमाण किमान पातळीवर ठेवावें आणि उत्पादनाच्या खर्चावर अवास्तव ताण न पडतां भांडवल फिरत राहील अशा पद्धतीनें प्रचार करावा, असेंहि एक तत्त्व मीं ठरवून दिलें होतें. नेहमींच्या पुरवठ्याला फार नफा उपलब्ध होणें जरुर असेल तर सुटे भाग अथवा अर्धपूर्ण मालाचें उत्पादन हातीं घेण्यास किंवा कच्चा माल तयार करण्यास कचरूं नये -- मागें पुढें पाहूं नये असेंहि आणखी एक अगदीं निर्वाणीचें तत्त्व मी योजून दिलें होते.

अगदीं जिवंत, चैतन्यपूर्ण वस्तूप्रमाणें माझा व्यवसाय वाढूं लागला होता. मी हात घालीन त्यांत यश येऊं लागलें. अशा तऱ्हेनें मी अगदीं कल्पनारम्य देवसदृश बनलों. मी आदर्श झालों होतो. मी जीवनाचा नवा मार्ग निर्माण केला आहे अशी माझी ख्याति झाली होती. माझ्या क्षुल्लक उक्ती, माझ्या सामान्य कृती यांची चिकित्सा होऊं लागली होती. त्यांची आंतरबाह्य तपासणी होऊन त्या सर्वांतील 'तथ्य' प्रकट करण्यांत येऊं लागलें; आणि

पान क्र. ३१



लोकांपुढें तीं नवीं तत्त्वें म्हणून सादर करण्यांत येऊं लागलीं.

या सर्वांमागील सत्य काय आहे ? याचें कारण माझा व्यवसाय वाढतो आहे -- जिवंतपणें वाढतो आहे हेंच आहे. माझ्या व्यवसायाचें पुढें पडणारें एकादें पाऊल जरी थांबलें तरी तें अत्यंत घातक ठरेल. कारण वाढत्या धंद्यांत, त्यांतील देखरेख करणारा वरिष्ठ नोकरवर्ग उत्पादनाच्या मानानें कमींच रहातो. मात्र तो वर्ग उत्पादनाच्या प्रमाणाबरोबर होऊं दिला तर, आधींच कमी असलेला नफाच गिळंकृत करून टाकील. माझा उद्योग इतक्या त्वरेनें वाढला कीं तो आतां, समतोलपणें परिपक्व दशेकडे जाणाऱ्या सजीव वस्तूपेक्षां, फुग्याप्रमाणेंच भासत आहे. उदाहरणार्थ, कित्येक खात्यांतून गुलामाप्रमाणें कामगारांना हांकावे तरच इतर खात्याच्या बरोबरीनें पाऊल टाकतां येतें; आणि एका भागाची डागडुजी करावी न करावी तों दुसऱ्या खात्यांत दुरुस्ती करण्याची पाळी येते. हें जर मध्येंच थांबविलें तर कामगार लोकांना दैन्य सोसावें लागेल. मला तर हें आंवाक्याबाहेर गेल्यासारखें वाटतें. शिवाय मीं मानवजातीला काय प्राप्त करून दिलें आहे ? लोक सुलभरीतीनें प्रवास करूं शकतात. परंतु त्यामुळें परस्परांबद्दलची जाणीव अधिक वाढली आहे कां ? माझें अनुकरण करून इतरहि जीवन सुकर करूं शकतील अशा वस्तूंचें प्रचंड प्रमाणांत उत्पादन होऊन, त्या विकत घेणारे लोकहि वाढूं लागले. पण त्याचा परिणाम म्हणजे गरजांत वाढ झाली आहे व नफ्याचा लोभहि वाढला आहे. माझ्या कामगारांना मी भरपूर मजुरी देतो पण त्यामुळें इतर कारखान्यांतील लोकांपेक्षां आपली मिळकत अधिकाधिक वाढावी अशी इच्छा मी त्यांच्या ठिकाणीं निर्माण करून बसलों

पान क्र. ३२



आहे, असें दिसत आहे. ते असंतुष्ट आणि असमाधानी आहेत असें मला वाटतें; किंबहुना ते दुःखी आहेत असेंच मी म्हणेन. त्यांच्या राहणीचें मान वाढविल्यामुळें, त्यांच्या कल्याणाची हमी दिल्यामुळें त्यांनीं मानवी व्यक्तित्वाच्या विकासाचा प्रयत्न करावा ह्या माझ्या अपेक्षेच्या उलटच घडलें आहे. मानवी दैन्याचें आणि दुःखाचें प्रमाण खरोखर पूर्वींइतकेंच राहिलें आहे; तें पूर्वींपेक्षाहि भयंकर झालें असून माझ्या प्रयत्नांनीं त्यांत फरक पडण्याची आशा दिसत नाहीं. माझ्या प्रयत्नांनीं दुरुस्त करतां येणार नाहीं, अशी कांहींतरी मूलभूत चूक, यामध्यें असली पाहिजे; पण ती कोणती हें मात्र मला उमजलेलें नाहीं. अजून कोणत्या तरी रहस्याचा उलगडा व्हावयाचा आहे असें मला वाटतें आणि तें रहस्य कळेपर्यंत आपले सर्व प्रयत्न विफलच होणार !

पान क्र. ३३



मल्ल


माझा ज्या कुळांत जन्म झाला तें होतें एक मल्लांचें कुटुंब. माझे आईबाप सर्व प्रकारचे खेळ, सामने व शारीरिक कसरती यांत निपुण होते. माझ्या आईनें तर पोहोण्यांत, पाण्यांत सूर मारण्यांत, तिरंदाजींत, खड्गक्रीडेंत आणि नृत्यकलेंत विशेषच प्राविण्य संपादन केलें होतें. या साऱ्या क्रीडांतील तिनें प्राप्त करून घेतलेलें पटुत्व चांगलेंच गाजलेलें होतें; आणि स्थानिक सामन्यांत कित्येकदां तरी तिनें पहिल्या क्रमांकाचें मान-पद पटकाविलें होतें.

तसेंच माझे वडील हे एक विस्मयजनक व्यक्ति होते. त्यांनीं जें जें हातीं घेतलें तें सारें यशस्वी झालें. विद्यार्थिदशेंत तर त्यांनीं फुटबॉल, बास्केट बॉल व टेनिस या खेळांत चांगलेंच नांव कमाविलें होतें. शिवाय मुष्टियुद्धांत आणि रानावनांतून धांवण्याच्या शर्यतींत तर त्यांनीं आपल्या जिल्ह्यांत अजिंक्यपद मिळविलें होतें. पुढें कांहीं दिवसांनीं ते एका सर्कशींत काम करूं लागले, व झोंपाळ्यावरील कामांत आणि अश्वारोहणांत त्यांनीं प्रसिद्धि मिळविली. पण कमावलेलें प्रमाणबद्ध शरीर आणि कुस्ती हीच त्यांचीं वैशिष्ट्यें होतीं. या क्रीडाविषयक उपक्रमामुळें त्यांचें नांव अनेक ठिकाणी ऐकूं येऊं लागलें.

पान क्र. ३४



स्वाभाविकपणेंच, शरीराची योग्य वाढ करण्यास, त्याचप्रमाणें तें आरोग्यसंपन्न, मजबूत आणि कार्यक्षम करण्यास आवश्यक अशी ती आदर्श परिस्थिति होती. विविध शारीरिक व्यायामांची उत्कटतेनें सराव करून प्राप्त करून घेतलेली सारी शारीरिक गुणसंपदा माझ्या वांटयास सहजतेनें आली होती. या खेरीज, माझ्या व्यायामपटु माता-पित्यांना त्यांचें स्वप्न माझ्या ठिकाणीं साकार व्हावें असें वाटे. म्हणजे, मी एक मोठा यशस्वी मल्ल व्हावें अशी त्यांची इच्छा होती म्हणून आरोग्य, बळ, जोम नि जीवनशक्ति मिळवावयास लागणारें सारें ज्ञान व सारा अनुभव मला सुपूर्त करून त्या उभयतांनीं आस्थेवाईकपणें मला वाढविलें; आणि हें उद्दिष्ट साध्य करण्यासाठीं जें जें मला साहयकारी होतें तें काहींहि दृष्टिआड होऊं दिलें नाहीं. यादृष्टीनें लहानपणापासूनच आहार, वस्त्रप्रावरण, निद्रा, स्वच्छता, चांगल्या संवयीं इत्यादि विषयींच्या, आरोग्यास अनुकूल ज्या ज्या उत्तमोत्तम गोष्टी व्यवहारांत शक्य होत्या त्या त्या साऱ्या, त्या उभयतांनीं परिपूर्त केल्या. पुढें पुढें त्यांनीं शारीरिक व्यायामांची सुव्यवस्थित आंखणी करून माझ्या शरीराचे ठिकाणी रेखीव प्रमाणबद्धता, सौंदर्य, समतोलपणा व सुसंवाद या गुणांची हळुंहळु जोपासना केली. या नंतर त्यांनीं माझ्या ठिकाणीं चपलता, धारिष्ट, दक्षता, अचूकपणा व सुसंगति या गुणांची वाढ व्हावी म्हणून खटपट केली, आणि अखेरीस मला सामर्थ्य आणि सहनशक्ति प्राप्त व्हावी म्हणून तालीम देण्यांत आली.

मला एका वसतिगृह असलेल्या शाळेंत दाखल करण्यांत आलें. पण तेथें माझें चित्त शारीरिक शिक्षणाच्या कार्यक्रमांकडेच जास्तींत

पान क्र. ३५



जास्त वेधलें जाणें हें अगदीं स्वाभाविक होतें. शारीरिक शिक्षणांत मी विशेष दक्षतेनें मन घालण्यास प्रारंभ केला आणि थोडयाच वर्षांत हळुहळू माझ्या शाळेंतील चांगल्या क्रीडापटूंच्या व मल्लांच्या बरोबरचें स्थान मीं घेतलें. आंतरशालेय मुष्टियुद्धाच्या सामन्यांत मी विजेतेपद मिळविलें. हाच माझा पहिला विक्रम. यायोगें माझ्या आईवडिलांचें स्वप्न परिपूर्त होण्याच्या मार्गावर असलेलें पाहून त्यांना किती सानंद अभिमान वाटला ! यशस्वी झाल्यानें मला विशेषच हुरूप वाटूं लागला, आणि पुढें शारीरिक शिक्षणाच्या साऱ्या शाखोपशाखांच्या तंत्रांत प्रभुत्व संपादन करण्याचा व त्या शाखोपशाखांतील कौशल्य हस्तगत करण्याचा मी निर्धारच करून टाकला; अर्थातच या निर्धाराच्या मागें उत्सुकता, आस्था आणि अविश्रांत कष्ट होतेच. निरनिराळ्या सामन्यांत भाग घेऊन शरीराच्या विविध शक्ती विकासित करण्याचें शिक्षण मला देण्यांत आलें. माझा त्यावेळीं असा समज होता कीं, सर्वांगीण शारीरिक शिक्षणानें विशेष उच्च प्रकारचें यश मिळवितां येतें व एकदोन किंवा अनेक खेळांत सुद्धां प्रभुत्व संपादितां येणें शक्य असतें. याचसाठीं जेव्हां जेव्हां संधि आली त्या त्या वेळीं क्रीडाविभागाच्या साऱ्या उपक्रमांत मीं भाग घेतला. वर्षानुवर्षें खुल्या विजेतेपदाच्या सामन्यांत कुस्ती, मुष्टियुद्ध, वजन उचलणें, शरीरसौष्ठव, पोहणें, मैदानी खेळ, टेनीस, शारीरिक कसरती व इतरहि अनेक कार्यक्रमांत यश सतत माझ्या बाजूस होतें.

आतां मी १८ वर्षांचा झालों होतों. मला आतरप्रांतीय विजेतेपदाच्या सामन्यांत भाग घ्यावयाचा होता. शरीराच्या सर्वांगीण विकासावर माझा विश्वास असल्यानें 'डीकॅथलॉन' या खेळाची

पान क्र. ३६



मीं निवड केली. साऱ्या खेळांत हा खेळ म्हणजे अति कष्टप्रद; कारण तो खेळावयाचा म्हणजे वेग, सामर्थ्य, सहनशक्ति, सर्वांगांचें सहकार्य आणि इतर पुष्कळ गुणांची सर्वोच्च कसोटीच असते. मीं त्या खेळाचें शिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि सहा महिन्यांच्या कष्टप्रद सरावानंतर त्यांत मीं सहज लीलेनें विजेतेपद मिळविलें -- दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू तर किती मागें पडला होता !

स्वाभाविकच राष्ट्रीय शारीरिक शिक्षणाच्या व्यवस्थापक मंडळींनीं मला जागतिक ऑलिंपिक सामन्यांत भाग घेण्यास पाठविण्याचें मनांत आणलें, आणि त्यानंतर पुढील दोन वर्षांत व्हावयाच्या ऑलिंपिक सामन्यांत 'डीकॅथलॉन' खेळांत भाग घेण्यासाठीं माझ्या देशातर्फें मीं जावें असें मला सुचविण्यांत आलें. ज्या विजेतेपदासाठीं साऱ्या जगांतील उत्तमोत्तम निवडक मल्ल जमा होतात त्यासाठीं स्पर्धा करणें थट्टा नाहीं. अवधीहि अगदीं थोडाच होता.

म्हणून वडिलांच्या नेतृत्वानुसार तयारीस लागलों. आईची आस्थेवाईक जपणूक होतीच. दीर्घकाळ भगीरथ प्रयत्न करावयाचे होते. कधी कधीं प्रगति अशक्य भासे. सारें कांहीं अति कठीण वाटे.. पण दिवसानुदिवस, मासानुमास माझ्या कार्यांत माझें पाऊल पुढेंच पडत गेलें. अखेर जागतिक ऑलिंपिक सामान्यांचा दिवस उजाडला.

बढाई मारूं नये, पण मी मात्र अपेक्षेबाहेर बराच चांगल्या रीतीनें खेळलो. 'डीकॅथलॉन' खेळांत तर मीं जागतिक विजेतेपद मिळविलेंच; इतकेंच नव्हे तर विक्रमाची पातळी इतकी उंच नेली कीं, ती पूर्वीं कधीं गांठण्यांत आली नव्हती; तसेंच अजूनहि तेथपर्यंत कोणास पोहोंचतां आलेलें नाहीं. हें शक्य होईल असें

पान क्र. ३७



कोणासच वाटलें नव्हतें. तथापि तसें घडून मात्र आलें; आणि त्यायोगें माझी आणि माझ्या मातापित्यांची सर्वश्रेष्ठ महत्त्वाकांक्षा फलित झाली.

हें सर्व यथास्थित झालें. पण माझ्यामध्यें एक चमत्कारिक बदल घडून आला. मी यशाच्या आणि कीर्तीच्या शिखरावर विराजत होतो, तरी त्याचवेळीं एक प्रकारची दुःखाची संवेदना, एक प्रकारच्या रितेपणा जवळ जवळ येत आहे असें माझ्या लक्षांत आलें; -- जणुं अंतरीं कोणीतरी म्हणत होतें कीं, कांहींतरी हुकलें आहे, कांहीं तरी शोधावयास हवें आहे, कशाची तरी माझ्यामध्यें प्रस्थापना व्हावयास पाहिजे आहे. ही आंतली प्रेरणा असेंच जणुं म्हणत होती कीं, मीं प्राप्त करून घेतलेलें शारीरिक कौशल्य, कार्यक्षमता नि शक्ति, ही सारी, अधिक चांगल्या रीतीनें कामीं यावी, असें कदाचित आणखी कांहीं तरी कार्य असलें पाहिजे. परंतु तें काय असूं शकेल, याची मात्र मला यत्किंचितहि कल्पना नव्हती. मग हळुहळूं ही स्थिति नाहींशी झाली. पुढें अनेक महत्त्वाच्या स्पर्धांत मी भाग घेतला, आणि त्या सर्वांत मीं चांगलें यश मिळविलें. पण प्रत्येक यशप्राप्तीनंतर ही वरील भावना माझें मन पुन: काबीज करीत असे.

अशा प्रकारें यशस्वी होत गेल्यानें माझ्या भोंवतीं तरुणांचें एक पथकच जमा झालें. शारीरिक शिक्षणाच्या विविध प्रकारांत त्यांनीं मदत मागितली आणि मी ती आनंदानें केली. पुढें असें आढळून आलें कीं, माझ्या आवडत्या व्यवसायांत, म्हणजे खेळांत आणि शारीरिक व्यायाम-प्रकारांत, दुसऱ्यांना साह्य करणें ही एक मोठी आनंदाची गोष्ट होती; आणि असा शिक्षक म्हणूनहि माझें

पान क्र. ३८



काम चांगलेंच होतें. खेळ, सामने आणि क्रीडाकौशल्य यांच्या विविध प्रकारांत माझे बरेच शिष्य आश्चर्यकारक प्रगति करीत होते. शारीरिक शिक्षणाचा शिक्षक, या नात्यानें मी यशस्वी होत असल्यानें, मला खेळांची विशेष आवड असल्यानें व खेळाशीं संबंध सुटू नये अशी माझी इच्छा असल्यानें, मला असें वाटलें कीं, हें व्यायाम-शिक्षणाचे कार्य जीवित-कार्य म्हणून हाती घ्यावें. या शिक्षणाची आपली तात्त्विक बाजू चांगली तयार असावी म्हणून एका विख्यात शारीरिक शिक्षणाच्या महाविद्यालयांत मी दाखल झालों आणि चार वर्षांत शारीरिक शिक्षणाची पदवी घेतली.

अशाप्रकारें शारीरिक शिक्षणाच्या तात्विक नि प्रात्यक्षिक अशा दोन्हीं बाजूंवर प्रभुत्व मिळविल्यानें मीं कामास प्रारंभ केला. जोंवर मी एक मल्ल होतो तोंवर आरोग्य, सामर्थ्य, कौशल्य, शारीरिक सौष्ठव संपादन करावयाचें आणि स्वतःच्याच शरीराच्या बाबतींत पूर्णत्वाची उच्च पातळी गांठावयाची एवढेंच एकमेव उद्दिष्ट माझ्या डोळ्‌यांसमोर असे. आतां इतरांना हेंच उद्दिष्ट साध्य करतां यावें म्हणून मीं त्यांना साह्य करण्यास प्रारंभ केला. माझ्या देशांत सर्वत्र शिक्षकांसाठीं शिक्षणकेंद्रें चालविलीं, आणि त्यांतून शारीरिक शिक्षणासाठीं चांगले शिक्षक व मार्गदर्शक बाहेर पडले. त्यांच्या सहकार्यानें माझ्या देशाच्या अगदी कोनाकोपऱ्यांपर्यंत शारीरिक शिक्षण देणारीं अगणित केंन्द्रें उघडलीं. त्यायोगें आमच्या देशांतील सर्वसाधारण जनतेंत आरोग्य, शारीरिक शिक्षण आणि क्रीडाविहार याविषयीं आपुलकी व संवय सार्वत्रिक व्हावी व ती तशी शास्त्रीय पद्धतीनें व्हावी हा त्या केंद्रांच्या स्थापनेमागील हेतु होता. त्या केंद्रांचें कार्य उत्तम चाललें आणि कांहीं

पान क्र. ३९



वर्षांनंतर माझ्या देशांतील आरोग्याचें सर्वसाधारण मान बरेंच सुधारलें. खेळांत आणि इतर क्रीडाविभागांत, देशांत आणि देशाबाहेर या एकंदर उपक्रमाचें चांगलेंच फळ दिसून आलें. खेळांचें बाबतींत लवकरच माझ्या देशानें बरेंच वरचें आंतराष्ट्रीय कीर्तिस्थान प्राप्त करून घेतलें. मला एक गोष्ट मात्र कबूल केली पाहिजे कीं या कामीं मला माझ्या देशाच्या सरकारचें साह्य आणि आश्रय मिळाला आणि मला शारीरिक-शिक्षण-मंत्रिपद देण्यांत येऊन हें विशिष्ट कार्य माझ्याकडे सोंपविण्यांत आलें, म्हणूनच कार्याचा असा विस्तार करणें मला शक्य झालें.

एक मोठा शारीरिक शिक्षणतज्ज्ञ आणि तद्विषयक संघटनातज्ज्ञ अशी माझी कीर्ति जगाच्या साऱ्या भागांत लवकरच झाली, आणि आंतराष्ट्रीय क्षेत्रांत शिक्षण शास्त्रावर अंतिम मत देणारी व्यक्ति म्हणून मी मान्यता पावलों. शारीरिक शिक्षणाच्या माझ्या पद्धतीवर मीं व्याख्यानें द्यावीं व ती पद्धत त्यांच्या देशात सुरू करावी म्हणून मला अनेक देशांतून, सरकारी अधिकाऱ्यांकडून निमंत्रणें आलीं. जगाच्या प्रत्येक भागांतून माझ्यावर पत्रांचा नुसता पाऊस पडला; त्या पत्रांतून माझ्या शारीरिक शिक्षण विषयक पद्धतीसंबंधीं आणि शारीरिक शिक्षणाच्या क्षेत्रांतील त्या त्या देशांतील विशिष्ट प्रश्नांवर मी मार्गदर्शन करावें अशी विनंति केलेली असे.

तथापि मी कामांत गर्क असतांना सुद्धां मला वारंवार वाटत राहिलें कीं, माझी सारी शक्ति आणि कौशल्य, माझी सारी देशव्यापी शारीरिक-शिक्षण-संघटना आणि त्यांतून दिवसानुदिवस वाढत असलेलें सामर्थ्य, आंतराष्ट्रीय क्षेत्रांत पडणारा माझ्या मताचा विशेष प्रभाव -- हें सारें एकाद्या उच्चतर उद्दिष्टासाठीं, एकाद्या

पान क्र. ४०



अधिक उदात्त नि अधिक भव्य उद्दिष्टाप्रीत्यर्थ उपयोगांत आणतां यावें; आणि असें झालें तरच माझ्या हातून जें घडलें त्या साऱ्या कार्याला कांहीं खरा अर्थ प्राप्त होऊं शकेल. पण तें कार्य कोणतें असावें याची मला अजूनपर्यंत कल्पना येऊं शकलेली नाहीं.

कधीं कधीं तर मला 'अतिमानव' देखील म्हणण्यांत आलें आहे; परंतु मी अतिमानव नाहीं, अजूनहि प्रकृतीचा गुलाम, साऱ्या अज्ञानाचा, मर्यादांचा आणि अक्षमतेचा पुतळा, एकाद्या अपघातास किंवा रोगास, किंवा माणसास दुर्बळ करून सोडणाऱ्या एकाद्या मानवी विकारास बळी पडणारा असा एक मी मानवी जीव आहे. मला वाटतें कीं, कांहीं झालें तरी मी या साऱ्या गोष्टींच्या पलीकडे गेलेलो नाहीं, आणि मला शिकण्याला व अनुभव घ्यायला योग्य असें अन्य कांहीं तरी आहे.

आतां माझा अंतकाळ अगदीं नजीक येऊन ठेपला आहे, पण मला मृत्यूची भीति मुळींच वाटत नाहीं. एकांतिक दु:खभोग, क्षुधा व तृषा या संबंधींचा विचार मला अस्वस्थ करीत नाहीं. पण मला वाईट वाटतें तें एवढयासाठींच कीं, माझ्या समोरील समस्या माझ्या आयुष्यांत कांहीं मला सोडवितां आल्या नाहींत. जीवनांत मला मोठें यश मिळालें, कीर्ति, मानसन्मान, संपत्ति आणि ज्याचें स्वप्न मनुष्य रंगवू शकेल तें सारें मी मिळविलें. पण माझ्या प्रश्नांना कांहींच उत्तरें न सांपडल्यानें मला समाधान नाहीं. मला अजूनहि हें कळलेलें नाहीं कीं --

"जीवनांतील साऱ्या गोष्टी सुव्यवस्थित असूनहि हवें तें गवसलें नाहीं असें जें वाटतें तें काय आहे ? माझ्या शारीरिक पूर्णत्वाचा नि सामर्थ्याचा सर्वश्रेष्ठ उपयोग काय असूं शकेल ? माझ्या

पान क्र. ४१



देशव्यापी शारीरिक शिक्षण-संघटनेचें सामर्थ्य आणि सर्व राष्ट्रांत माझ्या मताला दिलें जात असलेलें महत्त्व, यांचा कोणत्या उद्दिष्टासाठीं जास्तीत जास्त उपयोग करतां येईल ?''

पान क्र. ४२


(नंतर अज्ञात मनुष्याचा शांत, सौम्य, स्पष्ट आणि प्रसन्न शांतियुक्त आवाज ऐकूं येतो.)

अज्ञात मनुष्य


तुम्ही जें काय जाणून घेण्याची इच्छा करीत आहां त्याविषयीं मी तुम्हाला कांहीं सांगूं शकेन. तुमच्या कार्याचे प्रकार आणि क्षेत्रें भिन्न असलीं तरी तुम्हां सर्वांचा अनुभव एक सारखाच आहे. तुमच्या अंगीकृत कार्यांत यशस्वी होऊनहि तुम्ही सर्वच समान निर्णयाला येऊन ठेपलां आहांत. कारण विश्वाचें वास्तव स्वरूप माहीत नसल्यामुळें वस्तुमात्राच्या बाह्य रूपाकडे तुम्ही पहात होतात, जाणीवेच्या वरवरच्या पातळीवरून तुम्ही सर्व जगत होतात.

तुम्ही मानवजातींतील निवडक लोक आहांत. जो उच्चांक मनुष्याला गांठणें शक्य आहे तो तुम्हांपैकीं प्रत्येकानें प्राप्त करून घेतला आहे. मानववंशाच्या अत्युच्च शिखरावर तुम्ही आहांत; पण या शिखरावरून पाहिलेंत तर पुढें खोल दरी आ वांसून उभी असून तुम्ही पुढें जाऊं शकत नाहीं. तुम्हांपैकीं कोणालाच समाधान लाभलेलें नाहीं. तसेंच, पुढें काय करावें, याचेंहि ज्ञान कोणाला नाहीं. स्वतःचें जीवन व दुसऱ्याचें बरें व्हावें ही इच्छा

पान क्र. ४३



यांतून उद्‌भवलेल्या समस्येचें उत्तर कोणालाच सांपडलेलें नाहीं. ही समस्या दुहेरी आहे. कारण खरोखरीच तिला दोन बाजू आहेत : व्यक्तिगत आणि सामूहिक. स्वत:चें संपूर्ण कल्याण साधून दुसऱ्याचेंहि कल्याण कसें साधावयाचें ? जीवनाच्या या कोडयाचें उत्तर तुम्हांपैकीं कोणाजवळच नाहीं; कारण, बरोबरच आहे. मानसिक पातळीवरील मनुष्याला हें कोडें सोडवितां येणार नाहीं. मग तो मानसिक दृष्ट्या किती कां श्रेष्ठ असेना ! त्याकरितां नूतन आणि उच्चतर अशी एक चेतना, सत्यचेतना, मनुष्यामध्यें निर्माण झाली पाहिजे. या बदलत्या बाह्य दृष्यांच्या पाठीमागें एक अनंत अस्तित्व आहे; संघर्ष करीत असलेल्या या अर्ध-जागृत, अजाण, विरोधी शक्तींच्या गर्दीमागें एकमेव, प्रसन्न अशी चेतना उपस्थित आहे; सतत घडणाऱ्या असंख्य आभासांच्या, असत्याच्या पाठीमागें एक विशुद्ध, उज्ज्वल, महान् सत्य आहे; अस्पष्ट आणि दृढमूल अज्ञानाच्या पाठीमागें सर्वसत्ताधीश ज्ञान आहे.

तसेंच, जें अस्तित्व, जी सत्ता तुमच्या अगदीं जवळ -- तुमच्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानीं, त्याचबरोबर विश्वाच्याहि केंद्रभागीं आहे ती शोधून काढून जीवनांत तिचा अनुभव घेतला पाहिजे. त्यामुळें तुमच्यापुढील सर्व समस्या सोडविण्यास तुम्ही समर्थ व्हाल; सर्व अडचणी ओलांडून जाल.

तुम्ही कदाचित् म्हणाल, कीं सर्व धर्मांचा नेमका हाच तर उपदेश आहे : या सत्तेला 'देव' असें नांव देऊन बहुतेक सर्व धर्मांनीं याविषयीं सांगितलें आहे. खरें आहे; पण तुमच्या समस्यांचा समाधानकारक उलगडा त्यायोगें झालेला नाहीं. तुमच्या प्रश्नाचें नि:संदिग्ध असें उत्तर ते देऊं शकलेले नाहींत; उलट दु:खित मानव-

पान क्र. ४४



जातीच्या दुःखांवर उपाय सांगण्याच्या कामीं ते सर्वस्वी अयशस्वी ठरले आहेत.

यांपैकीं कांहीं धर्म, धर्मसंस्थापकांच्या वैयक्तिक अनुभूतीवर, तर दुसरे कांहीं, तत्त्वज्ञानात्मक आणि आध्यात्मिक ध्येयावर आधारलेले होते. परंतु लवकरच त्या अनुभूतींना विधिनिषेधांचे आणि तात्त्विक ध्येयाला मताभिनिवेषाचें स्वरूप आलें. त्यामुळें त्यांच्यामध्यें असलेलें तथ्य नाहींसें झालें. शिवाय, तसेंच म्हणावयाचें तर सर्वच धर्मांनीं मनुष्याच्या समस्यांना उत्तर देण्यासाठीं अन्य जगाकडे नेणारा मार्ग दाखविला आहे. मृत्यू हा त्याचा आधार आहे; तो या जीवनावर आधारलेला नाहीं. या मार्गाचा मथितार्थ असा कीं जगांतील अनिष्ट, अमांगल्य अपरिहार्य आहे. अशा जगांत कांहींहि कुरकुर न करतां आपलीं सर्व दुःखें सहन करा, तुमच्या त्यागाचें फळ मरणोत्तर तुम्हांस खास मिळेल; किंवा जीवनावरील आसक्ति सोडून द्या, म्हणजे निष्ठुर जीवनाच्या अटळ जांचांतून तुम्ही मुक्त व्हाल; त्यांतच तुमचें कल्याण आहे. मानवजातीच्या दुःखावर किंवा जगाच्या एकंदर परिस्थितीवर कांहींच उपाय योजला गेला नाहीं. तसें पाहिलें तर जगांतील गोंधळ, अव्यवस्था आणि दुःख यांवर खरा उपाय शोधून काढावयाचा तर तो या जगांतच शोधला पाहिजे. केवळ तेथेंच तो सांपडणार आहे. तेथेंच तो अंधारांत लपलेला आहे. आतां फक्त तो उजेडांत आणावयाचा. तो उपाय गूढ नाहीं किंवा काल्पनिकहि नाहीं. प्रकृतीचें निरीक्षण जर आपल्याला करतां येत असेल तर, तो तिनें स्वतःच उपलब्ध करून ठेवला आहे. तो अगदीं व्यवहार्य व स्पष्ट आहे. प्रकृतीनें निसर्गाच्या सर्व घडामोडींत चढता क्रम राखलेला आहे. एका

पान क्र. ४५



आकारांतून, एका कोटींतून, जातींतून, विश्वचेतनेचा अधिकाधिक आविष्कार करण्यास समर्थ अशी दुसरी एक नवीन कोटी ती निर्माण करते.

त्यावरून हें सरळच सिद्ध होतें कीं विकासक्रमांतील मानवाची पायरी ही कांहीं अखेरची नाहीं. अर्थांतच मनुष्य कोटीच्या पाठोपाठ एक नवीन कोटी निर्माण होईल. मनुष्याचे पशुकोटीहून जसें भिन्नत्व आहे तसेंच भिन्नत्व, या नवीन कोटींतील व्यक्तींचें, मनुष्याहून राहील. आजच्या मानवी चेतनेची जागा एका नूतन चेतनेनें घेतली जाईल. ती आतां मनावर आधारलेली असणार नाहीं, तर अतिमानस तत्त्वावर आधारलेली असेल, आणि ही चेतना एका उच्चतर अतिमानवास किंवा दिव्य मानववंशास निर्माण करील.

ही शक्यता फार फार पूर्वीपासून लोकांनीं पाहिलेली आहे, आणि ती घडून येणारच अशी ग्वाही दिलेली आहे. पण आतां अशी वेळ आलेली आहे कीं ही शक्यता आतां या पार्थिव जीवनांतहि मूर्त, प्रत्यक्ष साकार झाली पाहिजे. म्हणूनच तुमच्यापैकीं प्रत्येकजण असंतुष्ट आहे. आपल्याला जें पाहिजे होतें तें कांहीं या जीवनांतून आपल्याला लाभलें नाही, अशी जाणीव तुम्हा प्रत्येकाच्या मनांत उत्पन्न झाली आहे. मानवाच्या जाणीवेच्या पातळींत आमूलाग्र बदल, परिवर्तन झाल्यानेंच फक्त, जग आजच्या संदिग्धतेच्या अंधारांतून बाहेर पडू शकेल. मानवाच्या जाणीवेमधील हें परिवर्तन, आणि उच्चतर, अधिक सत्य चेतनेचा उदय, ही गोष्ट केवळ शक्य नव्हे तर निश्चितच घडणार आहे; तेंच तर खरोखरी आपल्या अस्तित्वाचें अंतिम साध्य; आपल्या या जगांतील

पान क्र. ४६



जीवनाचा मूळचा खरा हेतु सुद्धां तोच आहे. आधीं जाणीवेचें रूपांतर, तिच्यांत बदल, झाला पाहिजे. नंतर प्राणशक्तीचें, भावनांचें आणि त्यानंतर बाह्य आकाराचेंहि रूपांतर झालें पाहिजे. जी नवनिर्मिति होणार ती याच क्रमानें होणार. वास्तविक प्रकृतीच्या सर्व घडामोडी म्हणजे सर्वोच्च सत्तेकडे, परमेश्वरी सत्तेकडे पुन: परत जाण्याची क्रिया आहे. ही सर्वोच्च परम सत्ता हीच सकल विश्वाचें, त्याचप्रमाणें त्यांतील प्रत्येक बारीक सारीक घटकाचें, एकाच वेळीं उमगस्थान आणि अंतिम उद्दिष्टहि आहे; सारभूत रूपानें -- सुप्त रीतीनें -- जें आपण आहोंतच, तसेंच प्रत्यक्षांत आपणांस व्हावयाचें आहे. आपल्या अस्तित्वाच्या अंतरप्रदेशीं, अंतरंगामध्यें जें सत्य, सौंदर्य, शक्ति आणि पूर्णत्व सुप्तरूपानें विराजमान आहे त्याचाच आविष्कार, संपूर्णत: ज्यामध्यें झाला आहे, असें बाहयजीवन आपण जगलें पाहिजे; असें घडेल तेव्हांच अखिल जीवन म्हणजे परमोच्च, अनंत, शाश्वत आणि दिव्य आनंदाची लीला ठरेल.

(सर्वत्र शांतता पसरते आणि मान्यतादर्शक अर्थपूर्ण दृष्टीनें प्रत्येक जण एकमेकाकडे पाहतो.)

त्यावर लेखक म्हणतो -- तुझ्या शब्दामध्यें कांहींतरी मोहक शक्ति आहे, सर्वत्र संक्रमित होणारें कसलें तरी सामर्थ्य आहे. खरेंच, एक नवीन दालन आमच्यापुढें खुलें झालें आहे. एक नवीन आशा आमच्या हृदयांत उदित झाली आहे. पण याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यास -- साक्षात्कार करून घेण्यास -- कांहीं काळ लागणार; कदाचित् अतिदीर्घ कालावधीहि

पान क्र. ४७



लागेल. पण आतां तर मृत्यू येऊन ठेपला आहे, अंत:काळ समीप आला आहे आणि अरेरे ! आतां तर मुळीच सवड नाहीं.

अज्ञात मनुष्य म्हणतो -- छे: छे: असें नाहीं. या बाबतींत 'फार उशीर', असा कधींच नसतो.

चला, आपण सर्व मिळून एकदिलानें, महान आकांक्षेनें संकल्प करूं या -- ईश्वरी कृपा अवतरण्यासाठीं आवाहन करूं या. चमत्कार काय, केव्हांहि होऊं शकतो. श्रद्धेचें बळ कर्तुंम् अकर्तुंम् आहे. शिवाय जें महान् कार्य घडावयाचें आहे त्यांत जर आपण उपयुक्त ठरणार असूं तर ईशकृपेचा हस्तक्षेप निश्चित होईल आणि आपलें आयुष्य वाढूं शकेल. ज्ञानी मनुष्याच्या नम्रतेनें आणि बालकाच्या सरळ ऋजु श्रद्धेनें आपण प्रार्थना करूं या; ही नवीन 'चेतना' नवीन शक्ति, नवीन सत्य, नवीन सौंदर्य यांना मनःपूर्वक आवाहन करूं या. यांचा आविष्कार पृथ्वीवर झालाच पाहिजे, म्हणजे त्यायोगें पृथ्वीचें परिवर्तन होईल; या भौतिक जगामध्यें अतिमानसिक जीवन सुशक्य होईल, साध्य होईल.

सर्वजण स्तब्ध होऊन एकाग्रचित्त होतात. अज्ञात मनुष्य पुन: बोलू लागतो.

''हे सर्वश्रेष्ठ सत्यदेवा, ज्या अद्‌भुत रहस्याचें दर्शन आम्हांस झालें आहे, जें रहस्य आमच्यापुढें उघड झालें आहे तें आमच्या जीवनांत आम्हाला संपूर्णतया उतरवितां यावें असें आम्हांस वरदान दे.''

पान क्र. ४८



सर्वजण पुन: प्रार्थना म्हणतात आणि एकाग्र होऊन बसतात. इतक्यांत अचानक कलावंताचा आवाज ऐकूं येतो. ''पहा ! पहा !''

क्षितिजावर एका बिंदूप्रमाणें एक जहाज दिसतें आणि हळुहळू तें किनाऱ्याकडे येऊं लागतें...

सर्वांचे कांहींतरी उद्‌गार ऐकूं येतात. अज्ञात मनुष्य म्हणतो, ''आपली प्रार्थना ऐकूं गेली !''

जेव्हां जहाज स्पष्टपणें दिसूं लागतें तेव्हां व्यायामतज्ज्ञ नावेच्या एका बाजूला उडी मारून, कांठाशीं येतो व आपला रुमाल काढून फडकवूं लागतो. जहाज अधिकच जवळ येतें. वैज्ञानिक एकदम उद्‌गारतो,

''त्यांनीं आपल्याला पाहिलें, ते आपल्याकडेच येत आहेत !''

आणि धीरगंभीर आवाजांत अज्ञात मनुष्य म्हणतो, ''येथेंच मुक्ति आहे, हेंच आहे 'नव-जीवन' !''

[ पडदा पडतो ]

पान क्र. ४९